|| शरण शरण हनुमंता ||
- वै. ह.भ.प. सुधाकर शेंडगे
- Apr 28, 2019
- 3 min read
Updated: Apr 6, 2023
-वै. ह. भ. प. सुधाकर शेंडगे.

श्री हनुमंताचे स्मरण केल्यास जीवाला आठ फायदे होतात.
बुद्धीर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता |
अजाऽयं वाक्पटुत्वंच हनुमत्स्मरणाद भवेत् ||
1. बुद्धी,
2. बळ,
3. यश,
4. धैर्य,
5. निर्भयता,
6. आरोग्य,
7. जन्ममरणातीत,
8. वाक्चातुर्य.
रामायणाचा विचार केल्यास हनुमंताचे सर्वांवर उपकार आहेत. 1. सीतेचा शोध - प्रभू वर उपकार. 2. राम सीता भेट - सीतेवर उपकार. 3. द्रोणागिरी आणणे - लक्ष्मणावर उपकार. 4. रामप्रभू आगमनाची वार्ता - भरतावर उपकार. 5. संकटकाळी साथ - सुग्रीवावर उपकार. रामायणातून हनुमंत वगळले तर त्यात काही रामच उरणार नाही. प्रभू रामचंद्राने त्रेतायुगात अकरा हजार वर्षे राज्य केले. शेवटी अवतार संपविला. मात्र हनुमंत त्यांच्यानंतर सहा दिवसांनी आले पण अद्याप पृथ्वीवर आहेत. सात चिरंजीवांमध्ये त्यांचाही उल्लेख आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानांश्च बिभीषण: कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः सप्तचिरंजीव : 1. अश्वत्थामा 2. बली 3. व्यास 4. हनुमान 5. बिभीषण 6. कृपाचार्य 7. परशुराम. भगवान से भक्त बडे, कह गये संत सुजाण | पुल बांधे रघुवीर चले, कुदी गये हनुमान || - संत कबीर देवांपेक्षा भक्त मोठे आहेत. कारण लंकेत जाण्यासाठी प्रभू रमचंद्रांना सेतू बांधावा लागला. पण हनुमान पूल न बांधता, रामाच्या अगोदर जाऊन आले. अशा हनुमंतास तुकाराम महाराज शरण आले.
शरण शरण हनुमंता | तुम्हा आलो रामदूता || शरण शरण ही द्विरुक्ती आहे. त्याचे सात अर्थ होतात. (सप्त कोटी). 1. स्थूल शरण : सूक्ष्म शरण. काही लोकांना आपण मुखाने शरण जातो. मात्र काहींना हृदयातून. पण हनुमंताला आतून व बाहेरून शरण. 2. त्रेतायुगात शरण : कलियुगात शरण. तुकोबाराय म्हणतात, त्रेतायुगात आपण होता. मी सुद्धा अंगद म्हणून होतो. त्यावेळी शरण होतो. आता कलियुगात आपण चिरंजीव आहात आणि मी तुकाराम आपणास आताही शरण. म्हणून शरणागतीची द्विरुक्ती. 3. मारुतीराया : आपण सागर उल्लंघन करून सीतेचा शोध लावला. शिवाय दुसरा संसार सागर तो सुद्धा पार केला. म्हणून द्विरुक्ती. 4. धन- काम विरहित : हनुमंता ! आपणास स्त्री अथवा धन-काम विलोभीत करू शकत नाही. काम नाही काम नाही | झालो पाहिजे रिकामा || ज्यावेळी सीतेच्या शोधात हनुमंत गेले, तेंव्हा रावणाच्या 80000 स्त्रिया वेगवेगळ्या महालात राहत होत्या. सूक्ष्मरूपाने हनुमंतांनी काम चेष्टा पाहिल्या. सीता शोध करून आल्यानंतर रामप्रभू सहज म्हणाले, "हनुमन् ! त्यांचे शृंगार पाहिल्यानंतर आपणास लग्न करावे वाटले नाही का ?" तेव्हा हनुमंत म्हणतात, कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वता रावण स्त्रिया | न तु मे मनसा किंचित वैकृत्यं उपपद्यते || मी सर्व पाहिले पण काम जागृत झाला नाही, कारण मी रामाचे काम करण्यास गेलो होतो. 5 सुभटा : जो 10000 सैन्याशी एकटा लढतो त्याला" सुभटा" असे म्हणतात. रावणाच्या सैन्यास जिंकले म्हणून शूर. मन आणि इंद्रियास जिंकले म्हणून शूर. संसार सागर जिंकला म्हणून शूर. जिंकी जे संसार | येणे नावे तरी शूर || दोन्ही ठिकाणी शूर. म्हणून तुकोबाराय "शरण शरण हनुमंता" असे म्हणतात. 6. हनुमान : हनुमान या शब्दाचे दोन अर्थ होतात. हन् म्हणजे मारणे. मान म्हणजे अभिमान. आपला अभिमान रामात अर्पण करणारा. म्हणजेच अभिमान मारणारा. जेव्हा लंका दहन करून हनुमंत परत आले तेव्हा रामप्रभू म्हणाले, आपण फार मोठे कार्य केले. लंका जाळली. हनुमंत विनयाने म्हणतात, "ती लंका सीता मातेच्या क्रोधाने आधीच जळाली होती मी फक्त निमित्तमात्र" विश्वासे नैव सीतायां राजन कौपानालेच | पूर्वदग्धत्विया लंका निमित्तोपि भवेत कपि || अभिमानी जो रावण, त्याचा गर्व हरण करणारा असे दोनवेळा शरण. 7. हनुमंत देव आणि भक्त : हनुमंता, तू भक्त म्हणून शरण. आणि मूळचा महादेव म्हणून शरण. देव आणि भक्त यांना शरण. (हनुमंत शंकराचे अवतार आहेत.)
तुका म्हणे रुद्रा, अंजनीच्या कुमरा || अंजनिच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी || अशा सात कोट्या तयार झाल्या म्हणून "शरण शरण हनुमंता". सेवेचा प्रताप जाणे हनुमंत | तेणे सीताकांत सुखी केला || मनोजवं मारुततुल्यवेगं | जितेन्द्रियं बुद्धीमताम् वरिष्ठं | वातात्मजं वानर यूथ मुख्यं | श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये | हनुमंत रामाचा प्रिय असणारे भक्त आहेत. अतुलित बल धामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानीनामग्रगण्यम् | सकलगुणनिधानं वानराणांमधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि || ज्यांची शक्ती अतुलनीय आहे. ज्याचे शरीर सोनेरी पर्वतासारखे आहे. ज्याने शत्रचे वन विध्वंस केले. जे ज्ञानामध्ये अग्रगण्य आहेत. सकाळ गुणांची खाण आहेत. वानरातत प्रमुख आहेत. व रामास प्रिय असणारे भक्त आहेत. अशा वायुसुतास मी नमन करतो. एका हनुमंताचे स्मरण केले असतात तिघांचे स्मरण होते. कारण हनुमंताच्या हृदयामध्ये राम सीता व लक्ष्मण यांचे वास्तव्य असते. पवन तनय संकट हरन मंगल मुर्ती रूप | राम लखन सिता सहित हृदयी बसऊ सुर भूप || - संत तुलसीदास. राम - ज्ञान. लक्ष्मण- वैराग्य. सीता - भक्ती या तीन गोष्टी ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, तो महात्मा ठरतो. अशा भक्तास देव प्रेम भक्ती दान देतो. दुःख, किळस, भीती, विवेक व देवावरील प्रेम याने वैराग्य प्राप्त होते. आशा श्रीराम भक्त हनुमानास कोटि कोटि प्रणाम.
Comments